अनेक महिलांचे लैंगिक शोषण प्रकरण : भोंदू ज्योतिषी अशोक खरातची HIV चाचणीअहवाल प्राप्त ; आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू
विधी-विधाने, दैवी शक्ती आणि अनिष्टाची भीती दाखवून अनेक महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या HIV चाचणीचा अहवाल आता प्राप्त झाला असून, तो निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालामुळे पीडित महिलांमध्ये पसरलेली संसर्गाबाबतची भीती काही प्रमाणात कमी झाली असली, तरी या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
अशोक खरात हा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता. समस्या, अडचणी किंवा कौटुंबिक संकटांवर उपाय शोधण्यासाठी त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना तो विविध विधी करण्याचा सल्ला देत असे. काही महिलांना ‘वाईट शक्तीचा प्रभाव’ असल्याचे सांगत, अनिष्ट टाळण्यासाठी विशेष विधी करणे आवश्यक असल्याचे पटवून देत असे. यामध्ये ‘योनी शुद्धी’सारख्या तथाकथित धार्मिक विधींचा बहाणा करून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले आहे.या प्रकरणाचा उलगडा एका पीडित महिलेने धाडसाने पुढे येऊन दिलेल्या तक्रारीमुळे झाला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. तपासादरम्यान काही व्हिडिओ आणि फोटोही समोर आले, जे समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली. पोलिसांनी यानंतर सखोल तपास करून अशोक खरातला अटक केली.

तपासादरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला तो म्हणजे, खरातने अनेक महिलांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा आरोप. त्यामुळे त्याच्यामार्फत एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराचा संसर्ग पसरला असावा, अशी भीती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्याची HIV चाचणी केली होती. आता या चाचणीचा अहवाल समोर आला असून तो निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, या प्रकरणात केवळ लैंगिक शोषणाचा मुद्दाच नाही, तर आर्थिक व्यवहारांचाही मोठा तपास सुरू होण्याची शक्यता आहे. अशोक खरातने आपल्या तथाकथित ज्योतिष व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याची चर्चा आहे. विविध प्रकारचे बनावट किंवा दुर्मीळ भासणारे खडे, रत्न, पॉलिश केलेले चिंचोके तसेच बनावटी मध विकून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याचा आरोप आहे. या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याची तयारी यंत्रणांनी सुरू केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खरातच्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे लवकरच सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) पाठवली जाणार आहेत. त्याचबरोबर त्याच्या विदेश दौऱ्यांची आणि विदेशी चलनातील व्यवहारांचीही तपासणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. फॉरेक्स व्यवहारांबाबत संबंधित यंत्रणा चौकशी करणार असून, त्याने विदेशातून आणलेल्या वस्तूंवर योग्य कस्टम ड्युटी भरली आहे की नाही याचाही तपास होण्याची शक्यता आहे खरातकडे स्वतःच्या नावावर काही मालमत्ता असल्याचेही तपासात समोर येत आहे. काही ठिकाणी तो थेट मालक आहे, तर काही जमिनी कुटुंबीयांसह भागीदारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे त्याच्या मालमत्तेची आणि उत्पन्नाच्या स्रोतांची तपासणीही महत्त्वाची ठरणार आहे. आयकर विभागाकडूनही या व्यवहारांकडे लक्ष दिले जात असून, पोलिसांकडून संबंधित कागदपत्रे विविध तपास यंत्रणांना देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूंचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिलांना मानसिक दबाव, भीती आणि धार्मिक विश्वासांचा आधार घेऊन जाळ्यात ओढल्याचे आरोप गंभीर मानले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तपास पुढे जात असताना आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमच्या वेब पोर्टल ला जाहिरात व बातम्या देण्यासाठी संपर्क करा मो. ८६०५९४८८५३


