सोमवारला ला रंगणार मतदार जनजागृती क्रिकेट सामना
राष्ट्रीय कार्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वांनी सहभाग व्हावे — सौरभ कटियार
@ विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सौरभ कटियार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवार,८ एप्रिल रोजी सकाळी ७:०० वाजता विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथील मैदानावर दहा हजार विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची आणि नागरिक यांची मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. याशिवाय अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी यांचा क्रिकेटचा सामना ही आयोजित करण्यात येणार आहे. सोबतच नृत्य गायन यांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त अधिकारी. कर्मचारी. विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने स्वीपचे नोडल अधिकारी, डॉ. कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनात अधिनस्त यंत्रणेकडून नियोजन केले आहे. यामध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील विद्यार्थी त्याचबरोबर त्यांचे पालक आणि महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस विभाग व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी एका परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे.
मानवी साखळी मध्ये मी मतदान करणार असे बोधचिन्ह रेखाटण्यात येणार असून यामध्ये तिरंगी रंगांच्या टोप्या परिधान केलेले विद्यार्थी सर्व अमरावती करांचे लक्ष वेधून घेतील. मानवी साखळी नंतर लगेच अधिकारी कर्मचारी आणि विविध स्वयंसेवी संस्थांची पदाधिकारी यांचा रंगीबेरंगी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असून हा सामना एक आगळावेगळा सामना असून सर्व अमरावती करांचे लक्ष याकडे लागले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम अमरावतीचा इतिहासात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि या उपक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलेआहे.