
राज्यभरातील आरटीओ कर्मचारी 24 पासून बेमुदत संपावर
अमरावती
आकृतीबंधाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचे राज्यभर समायोजन व महसूल विभागात बदली करण्याचा घाट परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडून घालण्यात आला आहे. ज्याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये(आरटीओ) पहायला मिळत आहे. या अन्यायी समायोजनाविरुध्द कर्मचा:यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता आरटीओ विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभर 24 सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.
मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना आरटीओचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर यांनी आरटीओ अमरावती यांच्या मार्फत राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांना बेमुदत संपाबाबत नुकतीच नोटीस दिलेली आहे. मोटार वाहन विभाग आरटीओ विभागासाठी शासनाने आकृतीबंधाला दोन वर्षांपूर्वी मान्यता दिलेली आहे. याला परिवहन आयुक्त स्तरावर प्रशासन तांत्रिक बाबी शोधून कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या पदोन्नतीच्या आनंदात विरजण टाकत असल्याची भावना आता कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. एकीकडे दोन वर्षापासून आकृतीबंधानुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती न देता कर्मचाऱ्यांची राज्यात आकृतीबंधाच्या नावाखाली समायोजन तर दुसरीकडे महसुल विभागनिहाय बदल्या करण्यात येत आहे. आकृती बंधानुसार पदाचे सेवा प्रवेश नियम गेल्या दोन वर्षापासून निर्णयाविनाच पडून आहेत, परिवहन आयुक्त यांच्या स्तरावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने सेवा प्रवेश नियम प्रलंबित राहत आहे, परिणामी कर्मचारी पदोन्नती पासून वंचित राहत आहे. राज्यात आरटीओच्या कामकाजा संदर्भात एकसूत्रता नसल्याने कर्मचारी वर्गास आणि विशेषत: जनतेस नाहक त्रास सहन करावा लागतो .
संघटनेने मागणी केल्यानुसार गठित झालेल्या कळस्कर समितीचा अहवाल गेल्या पाच वर्षापासून बासनात बांधून ठेवलेला आहे. हा कळस्कर समितीचा अहवाल लागू करावा, तसेच संगणक प्रणालीतील संभाव्य बदलाबाबत धोरण ठरविण्यात यावे, आकृतीबंधानुसार पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती देण्यात याव्या अश्या मागण्यांकरिता आरटीओ कर्मचारी 24 सप्टेंबर 2024 पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
या आशयाचे एक निवेदन मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर यांच्या नेतृत्वात अमरावतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांना देण्यात आले. यावेळी विजय गावंडे, प्रमोद राजनेकर, संगीता भिलावेकर, महेश मेश्राम, प्रीती मेहेत्रे, अरुण वाघमारे, अनिल मेश्राम, अक्षय राठोड, आशिष माथुरकर,
संजय चौधरी, जयसिंग राठोड, प्रवीण मुंगळे, साजिद अली, पराग जाधव, देवेंद्र कळमकर, समीक्षा वारकरी, दीपा पात्रे, मीनल गिरे, यशवंत रामटेके, योगेश पुसनाके, रितेश चुलेट, देवानंद खंडारे, रश्मी सोनार, सुहास वानखडे, श्वेता वैद्य, पंकज वानखडे, आशिष प्रधान, स्वप्निल खडसे, वीरेंद्र पटेल, प्रतिभा ठाकरे, अश्विनी वानखडे, दिपाली गवळी, ज्ञानेश्वर काळे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका!
राज्यातल्या परिवहन आयुक्त कार्यालयाने कर्मचा:याच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार केला आहे. ज्याचे पडसाद राज्यभर पहायला मिळतील. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सहनशिलतेची परिक्षा घेवू नका. जो पर्यत यामध्ये ठोस आश्वासन शासन स्तरावरून मिळणार नाही, तोपर्यंत राज्यातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावरून परत येणार नाही. पुन्हा तेच ते करण्यापेक्षा
‘करो या मरो’ ची भूमिका घेण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या संपूर्ण परिस्थितीला परिवहन आयुक्त तथा राज्य शासना जबाबदार राहील.
-अनिल मानकर,राज्य उपाध्यक्ष,मोटर वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटना.
ताज्या बातम्यांचे अपडेट व दररोज प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक नियमित वाचण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा