मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जिल्ह्यातून 468 अर्ज: २१० लाभार्थी पात्र
अमरावती
राज्यातील सर्व धर्मातील ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. भारतातील एकूण ७३ व राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात आजवर ४६८ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २१० लाभार्थी पात्र ठरले आहेत. लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करूनच अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा या योजनेत समावेश केला आहे. त्यानुसार राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले ऑफलाइन अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावे. योजनेचे लाभ स्वरूप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १४ जुलैच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेस शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तींना निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी या योजनेचा लाभ एकावेळी घेता येईल. यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रुपये ३० हजार इतकी असून, हा खर्च शासन करणार आहे. दरम्यान जिल्ह्यात ४६८ जणांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २१० अर्ज प्राप्त झाले आहे.
योजनेच्या पात्रतेचे निकष : लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, वय वर्षे ६० व त्यावरील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र असतील.
कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नसावा. चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे. लाभार्थी प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. ^ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग येथे संपर्क साधावा. -सुनील वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती.