अमरावतीत कमर्शियल गॅस सिलिंडर पुरवठा बंद !
हॉटेल व्यावसायिकांवर संकट : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
अमरावती
: कमर्शियल गॅसचा पुरवठा तातडीने नियमित करण्यात यावा, अन्यथा हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता असल्याची चिंता अमरावती रेस्टॉरंट अॅण्ड लॉजिंग असोसिएशनने व्यक्त केली आहे. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे, विशेषतः युनाइटेड स्टेट्स, इस्राएल आणि रण याच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर – सरकारच्या निर्देशानुसार गॅस
पुरवठ्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे गॅस वितरकांकडून हॉटेल व्यवसायिकांना कमर्शियल गॅसचा पुरवठा थांबविण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ तयार करणे जवळपास थांबले असून व्यवसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ येत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. यामुळे केवळ हॉटेल मालकच नव्हे तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवरही उपासमारीची वेळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोविड च्या काळातील लॉकडाऊनमुळे हॉटेल उद्योगाला दोन ते अडीच वर्षे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतर आता व्यवसाय सुरळीत होत असताना पुन्हा गॅस पुरवठा बंद झाल्यास उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन कमर्शियल गॅसचा पुरवठा तातडीने नियमित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत आणि संबंधित यंत्रणेला योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
लॉजिंग असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्रसिंग सलूजा, सचिव चंद्रकांत पोपट, सारंग राऊत, प्रभु आहूजा, समीर देशमुख, ओम प्रकाश खेमचंदानी, मनोज जयस्वाल, सुमित शर्मा, अक्षय ढोके, शक्ती राठोड, अभिजीत राठी, सचिन जयस्वाल, अमित कुकरेजा, अभिषेक राठी, अखिलेश राठी, आनंद भेले, अखिल चांडक, मयूर जिरापुरे, पंकज काळे, प्रकल्प चांडक, रोहित शर्मा, उदय बुब, मनीष खंडेलवाल, पियुष राठी, तेजस पोपट, सुमित साहू यांच्यासह बहुसंख्येने असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


