आजपासून विदर्भात वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता; शेतकऱ्यांनो काळजी घ्या !
विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये आज, ३० मार्चपासून हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन दुपारनंतर वादळी पावसाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि धांदल निर्माण झाली आहे.
आज प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. उर्वरित विदर्भातही वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामान आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.३० मार्चनंतर ३१ मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता असली तरी हवामान पूर्णपणे स्थिर राहणार नाही, असा अंदाज आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यानंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान पुन्हा वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने प्राथमिक स्वरूपात व्यक्त केली आहे.

या बदलत्या हवामानामुळे विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या काढणीस आलेली पिके, फळबागा आणि साठवलेले धान्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न थांबणे, झाडाखाली आश्रय न घेणे तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे ग्रामीण भागात सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस हवामानावर शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.


