राजू शेट्टी यांचा जवळचा माणूस, स्वाभिमानीचा बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता
बुलढाणा :
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? याचा काहीच भरोसा नाहीय. विशेष म्हणजे आज बुलढाण्यात राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडल्याची माहिती मिळत आहे. बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तरुण नेते रविकांत तुपकर यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बुलढाण्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे आज बुलढाणा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. या दरम्यान त्यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी रविकांत तुपकर आणि एकनाथ खडसे यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा बुलढाण्यात रंगू लागली आहे. यावर रविकांत तुपकर यांना विचारलं असता त्यांनी सध्या काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समोर येणं महत्त्वाचं आहे. दरम्यान स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आणि स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यात गेल्या वर्षभरापासून मतभेद असल्याच्या रंगल्या होत्या. त्यामुळे रविकांत तुपकर हे नाराज असल्याचे अनेकदा समोर आलेलं आहे. या कारणामुळे रविकांत तुपकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.
@विदर्भ प्रजासत्ताक