चंद्रपूर: काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
: चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखरे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली.
लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.
खासदार बाळू धानोरकर, शिवसेना कार्यकर्ता ते काँग्रेस खासदार असा प्रवास
बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर सरकारी शाळेत शिक्षक होते, त्यामुळे घरात कुठलाच राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं.
वय 47 वर्ष जन्म 4 जुलै 1975 शिक्षण – डी. फॉर्म फर्स्ट ईयर पत्नी – आमदार प्रतिभा धानोरकर मुलं – मानस आणि पार्थ
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार आहेत. वयाच्या 42 व्या वर्षी अगदी अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा स्तिमित करणारा प्रवास केला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यानी लवकरच पूर्ण केला.
पूर्ण जिल्ह्यात भाजपची घोडदौड असताना त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.
2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी आमदारकी जिंकली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढवली.2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.
लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसचे तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला.