
माकपचे जेष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; दिल्लीत एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१२ नवी दिल्ली
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. सीताराम येचुरी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत होते, मात्र त्यांना वाचवता आले नाही.माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, येचुरी यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला होता. येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूमोनिया आणि छातीत संसर्ग झाल्याच्या तक्रारीनंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. ७२ वर्षीय येचुरी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नंतर आयसीयूमध्ये हलवण्यात आले. मात्र गुरुवारी त्यांची मृत्यूंशी सुरु असलेली झुंज संपली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सीताराम येचुरी यांच्या पश्चात पत्नी सीमा चिश्ती येचुरी आणि मुले अखिला आणि आशिष येचुरी असा परिवार आहे.
सीताराम येचुरी आणीबाणीच्या काळात तुरुंगात जाऊन राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. डाव्या पक्षांना आघाडीच्या राजकारणात आणण्याचे श्रेयही सीताराम येचुरी यांना जाते. यूपीए वन आणि यूपीए टूच्या काळात त्यांनीच डाव्या पक्षांना सरकारचा भाग होण्यास पटवून दिले होते.
सीपीएमचे सरचिटणीस म्हणून एप्रिल 2015 मध्ये सीताराम येचुरी यांना जबाबदारी देण्यात आली होती तर 2016 मध्ये त्यांना राज्यसभेत सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला होता.