१३ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अमरावती येथे जनसन्मान यात्रा सोहळा
अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे संजय खोडके यांचे पत्रकार परिषदेतून आवाहन
*गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगणात जनसन्मान सोहळ्याची तयारी जोरात..
भव्य डोम मध्ये २० हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था.
*अमरावती ११
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अमरावती येथे येत आहेत. त्यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात रविवार १३ ऑक्टोबर २०२४ रोजी संत गाडगेबाबा समाधी मंदिर समोरील प्रांगण,गाडगे नगर अमरावती येथे दुपारी १.३० वाजता जनसन्मान यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीच्या विकासाला बळकटी व नवी दिशा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी कोट्यावधींचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने आज अमरावती विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. तसेच सरकारमध्ये असतांना जे काही धोरणात्मक निर्णय घेतले त्याचा सुद्धा अमरावतीला पुरेपूर लाभ झाला आहे. म्हणूनच ना.अजितदादा पवार यांचे आम्ही स्वागत व सत्कार करीत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जनसन्मान यात्रा सोहळा अमरावतीचे संयोजक संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पुढे बोलतांना राकॉ नेता संजय खोडके यांनी माहिती दिली की, लोकशाहीवर दृढ विश्वास असल्याने ना.अजितदादा पवार यांनी सरकार मध्ये असतांना अनेक लोकाभिमुख योज़ना सुरु केल्यात. त्यांच्या ३५ वर्षाच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत त्यांनी जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. त्यामुळे योजनांपुरती यात्रा मर्यादित न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे, त्यांच्या नेमक्या काय भावना आहे. हे देखील जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जाणून घेण्यात येत आहे. संपूर्ण राज्यभरात जनसन्मान यात्रेला जनतेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभत आहे. आता ही जनसन्मान यात्रा अंतिम टप्यात असून अमरावती मधील यात्रेच्या निमित्ताने आम्ही त्यांचे स्वागत व सत्कार करीत आहोत. या साठी संत गाडगे बाबा समाधी मंदिर समोरील प्रांगणात भव्य डोम साकारून जवळपास २० हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार १३ ऑक्टोबर रोजी ना. अजितदादा पवार यांचे शहरात आगमन होताच सर्वप्रथम राजमाता माँ साहेब जिजाऊ स्मारक आरटीचौक येथे पुतळ्याला अभिवादन, तेथून इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा, नंतर पंचवटी चौक स्थित कृषी महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा पुतळा व तेथून संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथे अभिवादन केल्या नंतर ना.अजितदादा पवार यांचे दुपारी १.३० वाजता जनसन्मान यात्रा सोहळाच्या विशाल मंचावर आगमन होणार आहे. असे सुद्धा संजय खोडके यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
अमरावतीमधील जनसन्मान यात्रेची तयारी पूर्ण झाली असून आयोजनाला घेऊन सहकाऱ्यांच्या छोट्या- छोट्या समिती स्थापन करून जबाबदारी देण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन अमरावती, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय (रूरल ) येथे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे अमरावतीकरांच्या वतीने स्वागत व सत्कार करायचा असल्याने जनसन्मान सोहळ्याला अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जनसन्मान यात्रा अमरावतीचे संयोजक संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
अमरावतीच्या विकासासाठी निधी दिल्या बद्दल अजितदादा सत्कार-आ.सौ. सुलभाताई खोडके
पत्रकार परिषदेला उपस्थित आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी सांगितले की ,उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या पाठपुराव्याने अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील वर्ष २०२४ मध्ये नवीन वाढीव कर आकारणी व वसुलीला शासनाकडून स्थगनादेश मिळाला. तसेच शहरातील मालमत्ताधारकांना जुन्या कर प्रणालीनेच कर लागू करून बिले पाठविण्याची कार्यवाहीबाबत महापालिका आयुक्तांना आदेशानंतर अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. अमरावती विधानसभा मतदार संघासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कोठ्यावधींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून ज्यामध्ये रस्ते विकास व पायाभूत सुविधांची निर्मिती-७४२ कोटी, पाणी पुरवठा व वितरण योजना-१,००० कोटी, इमारती बांधकामे-७१९ कोटी, शैक्षणिक विकासाच्या सुविधा (सारथी केंद्र सह अन्य शैक्षणिक सुविधा )-२६३, आरोग्य सेवा सुविधा व विस्तार- १९६ कोटी,क्रीडा सुविधांची निर्मिती-८२ कोटी, आवास योज़ना-१९० कोटी,चौकांचे सौंदर्यीकरणासाठी २० कोटी,पर्यटन विकास- २७ कोटी, महावितरण सुविधांची कामे-४९ कोटी इतक्या प्रमाणात निधी मिळाला. त्यामुळे अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहे. या बद्दल उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानीत स्वागत व सत्कार करीत आहे. जनसन्मान सोहळ्याला अमरावतीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी पत्रकार परिषदेतून केले.