
धक्कादायक! गणपती विसर्जनादरम्यान पाय घसरून २२ वर्षीय युवक नदीत बुडाला – कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला
दि.७ धा.रेल्वे प्रतिनिधी – सलमान
धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली या गावातील एक हसतं-खिदळतं आयुष्य काही क्षणांतच नदीपात्रात हरवून गेलं. २२ वर्षीय करण चव्हाण या युवकाचा गणपती विसर्जनाच्या वेळी पाय घसरून नदीत वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, वाघोली गावात उत्साहाचं वातावरण होतं. विसर्जनासाठी गावातील अनेक युवक नदीकाठी गेले होते. करण चव्हाण हा देखील आपल्या मित्रांसोबत बाप्पाच्या विसर्जनासाठी गेला होता. मात्र, विसर्जनाच्या दरम्यान अचानक पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला आणि क्षणात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. उपस्थितांनी लगेच शोधाशोध सुरु केली. काही वेळाने करणचा मृतदेह नदीत सापडला, पण तोवर काळाने आपलं काम केलं होतं.
ही दुर्घटना वर्धा जिल्ह्यातील धनोडी, तालुका आर्वी येथील नदीपात्रात घडली. करणचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय, धामणगांव रेल्वे येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. करण हा आपल्या कुटुंबातील मोठा मुलगा होता. त्याच्या मागे आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आयुष्यावर या अपघाती मृत्यूने काळोख पसरवला आहे.
राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून दरवर्षी आवाहन केलं जातं की, विसर्जन काळजीपूर्वक करावं. मात्र काही युवक उत्साहाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचे परिणाम दुर्दैवी ठरतात. करणच्या निधनाने केवळ एक जीव गमावला गेला नाही, तर एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.
हा प्रसंग सर्व तरुणांसाठी जागृती करणारा आहे. गणेशोत्सव आनंदाने साजरा करणं आवश्यक आहे, पण त्याबरोबर सुरक्षिततेचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. करणच्या जाण्याने गावातील प्रत्येकाचं मन सुन्न झालं आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी, ही काळाची गरज आहे.
करणच्या अपघाती मृत्यूने गावात शोकसागर उसळला असून अनेकजण अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. “करण गेलाच कसा?” हा प्रश्न सर्वांच्या मनात घर करून बसला आहे. विसर्जनाच्या मंगल प्रसंगावर दुःखाचं सावट पसरवून गेलेला हा अपघात, अनेकांच्या मनात कायमचं घर करून राहील.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी वाचा आमच्या सोबत
आजच आमच्या चॅनल ला जॉईन व्हा !
आमच्या फेसबुक पेज,इंस्टाग्राम पेज ला लाईक करा
विदर्भ प्रजासत्ताक
आजच आमच्या चॅनल ला जॉईन व्हा !
आमच्या फेसबुक पेज,इंस्टाग्राम पेज ला लाईक करा
विदर्भ प्रजासत्ताक
