खतांची अवैध विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई 2 केंद्रांचे परवाने रद्द, तर 21 निलंबित
विदर्भ प्रजासत्ताक
जिल्ह्यातील कृषी विक्री केंद्रांकडून होणारी खतांची साठेबाजी, जादा दराने विक्री आणि खतांसोबत इतर निविष्ठांची सक्ती (लिंकींग) करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दोन कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, 21 केंद्रांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते योग्य दरात उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्हास्तरावर विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, तालुका स्तरावर 14 कृषी अधिकारी (खत नियंत्रण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जर एखाद्या केंद्रावर एमआरपीपेक्षा जास्त दराने खत विक्री होत असेल, साठा असूनही खत नाकारले जात असेल किंवा बोगस खतांची विक्री होत असेल, तर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक विक्री केंद्रावर एक क्यूआर (QR) कोड लावण्यात आला आहे, जो स्कॅन करून शेतकरी आपली तक्रार गुगल फॉर्मद्वारे नोंदवू शकतात. याव्यतिरिक्त, 8080536602 या व्हॉट्सॲप क्रमांकावरही तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

