अचलपूर नगरपरिषदेत भाजप–एमआयएम युती; समिती सभापती निवडीत राजकीय समीकरणांना कलाटणी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२२अचलपुर
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत आज राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. नगरपरिषदेमधील विविध समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीदरम्यान भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि एमआयएम यांच्यात अनपेक्षित युती झाल्याचे स्पष्ट झाले असून, या युतीमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली. या राजकीय समन्वयाचा परिणाम म्हणून एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळाले आहे. विशेष म्हणजे, भाजपने या निवडीत एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या युतीत केवळ भाजप आणि एमआयएमच नव्हे, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक तसेच तीन अपक्ष नगरसेवकही भाजपसोबत उभे राहिल्याची माहिती आहे. त्यामुळे नगरपरिषदेत सत्तासमीकरणे पूर्णतः बदलली असून, विरोधकांना हा अनपेक्षित धक्का मानला जात आहे.
अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम एकत्र आल्याने राजकीय आघाड्यांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. वैचारिकदृष्ट्या परस्परविरोधी मानल्या जाणाऱ्या पक्षांमधील ही जवळीक आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घडामोडीमुळे अचलपूरच्या राजकीय वातावरणात चांगलेच तापमान वाढले असून, पुढील काळात या युतीमुळे कोणते निर्णय घेतले जातात आणि नगरपरिषदेत कारभाराची दिशा कशी राहते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.”अचलपूर शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा केंद्रबिंदू आहे. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेची प्रत्येक समिती जबाबदारीनं काम करेल,” असं अचलपूरच्या नगराध्यक्षा रूपाली माथने यांनी स्पष्ट केलंय.

