दिवंगत नेता बाबा सिद्दीकी यांना राष्ट्रवादी परिवाराकडून श्रद्धांजली
राकॉ नेता संजय खोडके,आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली शोक संवेदना
अमरावती १३ ऑक्टोबर :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जेष्ठ नेता तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्धीकी यांच्या दुःखद निधनाबद्दल अमरावती मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच रविवार १३ ऑक्टोबर रोजी शहरात होणारी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा सुद्धा रद्द करण्यात आली. दिवंगत नेता बाबा सिद्धिकी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज गाडगे नगर स्थित संत गाडगे बाबा समाधी मंदिर प्रांगणात राष्ट्रवादी परिवाराकडून शोकसभा बोलावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके व आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी बाबा सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली. दिवंगत नेता बाबा सिद्धीकी हे सर्व क्षेत्रात व्यापक जनसंपर्क, लोकप्रिय, मनमिळावू स्वभाव व काम प्रिय व्यक्ती होते. तीनवेळा आमदार राहिलेले बाबा सिद्धीकी यांना विधिमंडळ कामकाजाचा अनुभव असल्याने एक उत्तम नेता म्ह्णूनही त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने एका अष्टपैलू नेत्याला आपण मुकलो असल्याची शोक संवेदना राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी व्यक्त केली. तर आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी सुद्धा राकॉ नेता बाबा सिद्दीकी यांच्या दुःखद निधनाबद्दल दुःख व्यक्त करीत शोकसंवेदना प्रकट केली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा दिवंगत नेता बाबा सिद्दीकी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण केली.