झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
विदर्भ प्रजासत्ताक
उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत दहा मुलांचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमी मुलांवर उपचार सुरू असून आर्थिक मदत करण्यासही सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले, “नवजात बालकांचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी आहे. कुटुंबीयांसोबत आम्ही नवजात बालकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्राथमिक तपास प्रशासकीय पातळीवर केला जाईल, जो आरोग्य विभाग करेल, त्यानंतर पोलीस चौकशी करणार आहेत. यामध्ये अग्निशमन विभागाची टीमही सहभागी होणार आहे. तर तिसरी चौकशी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.”
एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुलं दाखल होती – सीएमएस
या घटनेची माहिती देताना झाशीचे सीएमएस सचिन मेहर म्हणाले की, महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुलांना दाखल करण्यात आले होते. अचानक आग लागली, जी विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, बहुतांश मुले ऑक्सिजनच्या आधारावर असल्याने आग वेगाने पसरली. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडली.
मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
झाशी दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. “झाशी जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजच्या NICU मध्ये झालेल्या घटनेत मुलांचा मृत्यू अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृतांच्या आत्म्यांना मोक्ष आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी भगवान श्री रामाकडे प्रार्थना करतो.”
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !