आरक्षण फॅक्टर ‘विधानसभे’त फेल:मराठवाड्यात महायुतीचे तब्बल 26 मराठा आमदार विजयी,
जरांगेंच्या गढातही भाजपचा गुलाल!
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२६हिंगोली
मराठा आरक्षणाचे गढ ठरलेल्या मराठवाड्यातच जनतेच्या दरबारी मराठा आरक्षण फॅक्टर फेल झाल्याचे समोर आले आहे. विभागात महायुतीचे सर्वाधिक 26 मराठा आमदार विजयी झालेत. तर महाविकास आघाडीचे केवळ 3 मराठा आमदार निवडून आलेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आरक्षण मागणीला त्यांच्या भागातच मतदारांनी सपेशल नाकारत आपला कौल महायुती आणि त्यातही भाजपच्या बाजूने दिल्याचे दिसते.
मराठवाड्यात एकूण 46 मतदार संघ आहेत. त्यात सर्वाधिक 29 मराठा आमदार विजयी झालेत. तर ओबीसी 9, एससी 5, अल्पसंख्याक 2, तर एका जागेवर आदिवासी समाजाचा उमेदवार विजयी झालाय.
घोषणा, माघार, प्रभाव संपला
मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या म्हणत आंदोलन थांबवणाऱ्या आणि त्यानंतर पुन्हा सरकारविरोधात वारंवार आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मुस्लीम आणि दलित समाजासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली होती. जरांगे यांनी बीड शहर, केज, परतूर, फुलंब्री, हिंगोली शहर, पाथरी, हदगाव या 7 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला होता. तर भोकरदन, गंगापूर, कळमनुरी, गंगाखेड, जिंतूर, औसा या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडापाडी मोहीम राबवण्याचा इशारा दिला होता. तर 2 मतदासंघांमध्ये पाठिंबा देण्याचे ठरवले होते. मात्र, उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सकाळपर्यंत मित्र पक्षांची यादी आली नसल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर तुम्हाला कोणाला पाडायचे त्यांना पाडा आणि निवडून द्या, अशी भूमिका जाहीर केली. मात्र, ही भूमिकाही त्यांनी अनेकदा बदलत महायुतीला पाडण्याचे इशारे दिले. छगन भुजबळांच्या विरोधात प्रचारही केला. मात्र, जरांगे आणि त्यांची मराठा आरक्षणाची मागणी या दोन्हींची जादू विधानसभा निवडणुकीत तरी चालली नाही.
https://epaper.vidarbhaprajasattak.com