सरकार स्थापनेसंदर्भात नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य – एकनाथ शिंदे
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२७मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचं स्वागत केलं. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात. तुमच्या माध्यमांतून सगळ्या मतदारांचे आभार मानतो. हा जो विजय आम्हाला मिळाला तो अभूतपूर्व विजय आहे. गेल्या अनेक वर्षांत असा निकाल जनतेने दिलेले नाही. मागच्या अडीच वर्षात महायुतीने उत्तम काम केलं आहे. एकीकडे विकासकामं केली, महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं आहे. मी कार्यकर्त्यांचेही आभार मानतो असंही एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलंही मोजमाप व्हावं म्हणून मी काम केलं नाही. तर सरकार म्हणून काय देऊ शकतो ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभं राहिलं हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो. दोन ते अडीच वर्षांत लाखो कोटींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की कुठे घोडं अडलं आहे? मी मनमोकळेपणाने सांगतो आहे, मी काहीही ताणून धरलेलं नाही. मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
https://epaper.vidarbhaprajasattak.com