‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानाचे गणित बदलले
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२नागपूर :
‘फेइंजल’ चक्रीवादळाने राज्यातीलच नाही तर देशातील वातावरणाची गणिते बदलली आहेत. थंडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना आता कुठे थंडीचा आनंद घेता येऊ लागला होता. मात्र, “फेइंजल” ने या आनंदावर विरजण घातले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे थंडी कमी झाली असून राज्यातील एकूणच कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे.
“फेइंजल” चक्रीवादळामुले उत्तरेकडील शीतलहरी राज्याकडे येत आहेत. आज संपूर्ण राज्यातच ढगाळ हवामान आहे. तर भारतीय हवामान खात्याने काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक शहरातील कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. ३० अंश सेल्सिअस च्या आत हे तापमान होते. मात्र, कालपासून या तापमानात वाढ झाली असून कमाल तापमानाने ३० अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला आहे. राज्यातील किमान तापमानात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. अनेक शहरांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले होते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या होत्या. मात्र, कालपासून किमान तापमानात देखील वाढ होऊन ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे.
दरम्यान आता हवामान खात्याने सोमवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेकडील एटापली आणि सिरोंचा या तालुक्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नांदेड, लातूर, आणि सोलापूरसह काही इतर जिल्ह्यांमध्ये कमी उंचावरचे ढग पाहायला मिळतील. या ठिकाणी हवामान बदलाचा परिणाम जाणवू शकतो.एकूणच राज्यात पुढील काही दिवस थंडी कमी होत जाण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा प्रभाव कमी प्रमाणात दिसेल. श्रीलंकेजवळ तयार झालेले चक्रीवादळ ‘फेइंजल’ हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. पुदुचेरीजवळ हे वादळ धडकण्याचा अंदाज आहे.