परभणीतील आंदोलनांला आक्रमक वळण, दुकानांची जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक
विदर्भ प्रजासत्ताक
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथेफिरुने विटंबना केली. या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनीही आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे.परभणीतील बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र, जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
दरम्यान, आंदोलकांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती, अशी दुकाने आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला.
परभणी शहर बंद दरम्यान, काही मोर्चेकरी महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना आत सोडले. कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही मोर्चेकरांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे.
परभणीत संचारबंदी लागू
परभणीमध्ये आज आंबेडकरी अनुयायांकडून पुकारण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. परंतु, या आदेशाला न जुमानता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पुढील आदेशापर्यंत इंटरनेटही बंद
परभणीतील सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी 1 वाजेपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.परभणी शहरातील सात ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटून देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात येत आहे.