अटेम्प्ट टू मर्डर, गुन्हेगारी धमकी अन्…!
भाजपनं राहुल गांधींविरोधात या 6 कलमांखाली दाखल केली तक्रार
नवी दिल्ली
@विदर्भ प्रजासत्ताक
संसदभवन परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या धक्का-बुक्की प्रकरणावरून आता राजकारण जबरदस्त तापले आहे. भाजपने राहुल गांधींवर आपल्या खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. यात दोन खासदार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय एका महिला खासदारानेही राहुल गांधींवर आरोप केले आहेत. या धक्काबुक्की प्रकरणानंतर, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, भाजपने आपल्या तक्रारीत राहुल गांधींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
भाजपने संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, “त्यांना (राहुल गांधी) कायद्याचे उल्लंघन करण्याची सवय आहे. त्यांनी केलेल्या धक्का-बुक्कीत दोन खासदार खाली कोसळून जखमी झाले आहेत. हत्येचा प्रयत्नाशी संबंधित कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीएनएसचे कलम १०९ अन्वये तक्रार देण्यात आली आहे. या घटनेनंतरही राहुल गांधींचा अहंकार कमी झालेला नाही. ते खासदारांना न भेटताच निघून गेले. ते स्वतःला कायद्यापेक्षाही मोठे समजतात.यासंदर्भात, काँग्रेसनेही तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात बोलताना ठाकूर म्हणाले, ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’. हे तेच राहुल गांधी आहेत, जे आपल्याच सरकारमध्ये, आपल्याच सरकारचा अध्यादेश फाडतात. ही तीच काँग्रेस आहे, जीने बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केला.
BNS च्या या कलमांखाली करण्यात आलीय राहुल गांधीं विरोधात तक्रार –
– कलम 109: हत्येचा प्रयत्न
– कलम 115: जाणून बुजून दुखापत करणे
– कलम 117: जाणून बुजून गंभीर दुखापत करणे
– कलम 121: सरकारी कर्मचाऱ्याचे त्याच्या कर्तव्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी दुखापत करणे
– कलम 351: गुन्हेगारी धमकी
– कलम 125: इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे