उद्धव ठाकरे यांचा मित्रपक्ष काँग्रेसला सल्ला:म्हणाले – आता सावरकरांच्या नावाने बोलणे बंद करावे, नाना पटोलेंनी मात्र बोलणे टाळले
आता सावरकरांच्या नावाने बोलणे बंद करावे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेहरूंच्या नावाने रडगाणे बंद करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मात्र, उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्यावर बोलणे टाळले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलेल्या सल्ल्यावर मी काही बोलणार नसल्याचे पटोले म्हणाले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरातील हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली. त्यांनी विधानपरिषद सभागृहात उपस्थिती दर्शवली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेस आणि भाजपला उपरोक्त सल्ला दिला.
आताचा काळ आपल्याकडे बघतोय
मोदींनी नेहरूंचे रडगाणे बंद करावे, तर काँग्रेसने सावकरांवर बोलणे सोडावे, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू आपापल्या जागी आहेत. त्यांनी त्यांच्या काळात जे करायचे हेाते ते करून गेले. आताचा काळ आपल्याकडे बघत आहे. आता आपण काय करणार आहोत हे लोकांना दाखवले पाहिजे, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांवरून भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने सावरकरांना भारतरत्न का जाहीर केला नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस यांना अनेक वेळा पत्र दिले, मग अजून मान्यता का मिळाली नाही? असेही ते म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलणे टाळले
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलेल्या सल्ल्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता सध्या वर्तमानच धोक्यात असल्यामुळे आम्हाला भूतकाळातील घटनांवर बोलायचे नाही. आमच्यासाठी सध्या परभणी, बीड, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनी जो सल्ला दिला, त्यावर मी काही वक्तव्य करणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा सल्ला मित्र पक्ष काँग्रेस ऐकणार का? हे पहावे लागणार आहे.