प्रख्यात कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, अनेकजण जखमी
मेरठ
उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे शुक्रवारी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथावाचनाच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली. शिवमहापुराण कथावाचनादरम्यान, ही चेंगराचेंगरी झाली. मंडपातील व्हीआयपी भागामध्येय जाण्याच्या प्रयत्नात गेटवर गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये काही जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सूरजपाल उर्फ भोलेबाबा याच्या सत्संगामध्ये १२० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तशीच घटना पुन्हा घडल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार परतापूरमधील शताब्दीनगर येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा आज शेवटचा दिवस होता. यादरम्यान हजारोच्या संख्येने भाविक कथा ऐकण्यासाठी आले होते. प्रवेशद्वारावर बाऊन्सर्सनी रोखल्याने धक्काबुक्की झाली. त्यात काही लोक खाली पडले. तसेच त्या गोंधळानंतर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बहुतांश महिला आहेत. येथील कथावाचनाच्या कार्यक्रमाला दररोज दीड लाख भाविक उपस्थित राहत होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आज भाविकांची संख्या सुमारे अडीच लाखांपर्यंत पोहोचली होती.
कथावाचनाला सुरुवात झाल्यानंतर येथील व्यवस्था कोलमडून पडली. आतील मंडप पूर्णपणे भरून गेला होता. तर बाहेर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यात महिलांची संख्या लक्षणीय अशी होती. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य करून परिस्थिती नियंत्रमात आणली. दरम्यान, मेरठच्या आयजींनी सांगितले की, कथावाचनाच्या कार्यक्रमाला जाताना एक महिला खाली पडली होती. परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच कथावाचन सुरू आहे. तणावाची कुठलीही परिस्थिती नाही आहे. तसेच चेंगराचेंगरीसारखी परिस्थितीही निर्माण झालेली नाही.