‘मिनी सरस’ची कोटींची उलाढाल; पण सायन्सकोर मैदान कचराकुंडीत… नागरिकांचा संताप

अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत (डीआरडीए) आयोजित ‘मिनी सरस’ प्रदर्शनात अवघ्या पाच दिवसांत तब्बल १ कोटी ३ लाख ८६ हजार ४३२ रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. मात्र या यशस्वी प्रदर्शनानंतर सायन्सकोर मैदानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण ट्रॅकवर कचऱ्याचे ढिग पसरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सायन्सकोर मैदानावर ४ ते ८ मार्च दरम्यान हे प्रदर्शन पार पडले. डीआरडीएतर्फे दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदाच्या प्रदर्शनात २३६ महिला बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले होते. अमरावतीकरांनी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला आणि विक्रमी उलाढालही झाली. मात्र प्रदर्शन संपल्यानंतर मैदानाची स्वच्छता न केल्याने परिसर अस्वच्छतेने भरून गेला आहे.या मैदानावर दररोज सकाळी व संध्याकाळी शेकडो नागरिक चालण्यासाठी येत असतात. मात्र ट्रॅकवर कचऱ्याचे ढिग, उष्ट्या पत्रावळ्या, सडकी फळे, संत्री-पपई तसेच उरलेले अन्न फेकल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी उघड्यावर लघुशंका व सकाळची प्रातर्विधी केल्याचेही दिसून येत असल्याने नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून चालावे लागत आहे.दरम्यान, या प्रदर्शनासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र आणि डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक पालकमंत्र्यांसह विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले होते. मात्र आता प्रदर्शनानंतर मैदानाची तातडीने साफसफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.



