खरात प्रकरणात धक्कादायक उलगडा; गुंगी आणणारा द्रव आणि पेढ्यांचा कथित वापर तपासाच्या केंद्रस्थानी
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असून आता तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे गुंगी आणणारा द्रव आणि पेढ्यांचा कथित वापर. महिलांवर अत्याचार करण्यासाठी आरोपीने विशिष्ट पद्धत वापरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. रविवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत पोलिसांनी तपासासाठी आणखी वेळ मागितला. न्यायालयाने पोलिसांची बाजू ग्राह्य धरत आरोपी अशोक खरात याला १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पीडित महिलांना प्रथम खारट किंवा कडवट चवीचा द्रव पिण्यास देत असे. त्यानंतर त्यांना पेढा खायला देण्यात येत असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही गोष्टींचा परिणाम झाल्यानंतर महिलांना चक्कर येणे, मळमळ होणे किंवा शरीर जड झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे जाणवत होती. या अवस्थेचा फायदा घेत आरोपी त्यांना आपल्या ताब्यात घेत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
मात्र, या प्रकरणात वापरलेला द्रव पदार्थ नेमका कोणता होता, त्यात कोणते रासायनिक घटक होते किंवा पेढ्यामध्ये गुंगी आणणारे कोणते पदार्थ मिसळले होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी तपासात पूर्णपणे सहकार्य करत नसल्यामुळे अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या गूढाचा उलगडा करण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर देवस्थानासाठी मंजूर झालेल्या निधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पर्यटनस्थळांच्या अधिकृत यादीत नसतानाही २०१८ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून या देवस्थानासाठी सुमारे १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव कोणी दिला आणि त्यासाठी शिफारस कोणी केली, याबाबत प्रशासनाकडे स्पष्ट नोंदी उपलब्ध नसल्याचे समोर येत असून या बाबीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.सध्या या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पोलिस तपासात आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

