महसूल अधिकाऱ्यांचे आंदोलन स्थगित मागणीला तत्वतः मान्यता, एप्रिलअखेर कार्यवाही
अमरावती
राज्यातील हजारो महसूल अधिकाऱ्यांनी मागील ३ एप्रिलपासून सुरू असलेले आपले कामबंद आंदोलन आज, गुरुवारी मागे घेतले. शासनाने नायब तहसीलदारांना ४८०० रुपये ग्रेड पे देण्यास तत्वतः मान्यता देत त्यासंदर्भातील कार्यवाही एप्रिलअखेर करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे महाराष्ट्र् राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, राहुल मुंडके, मनोहर पोटे व बाळासाहेव वाकचोरे यांनी जाहीर केले.
यापूर्वी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पदाधिकारी यांच्यात झालेली चर्चा फलदायी ठरली. मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी ‘ग्रेड-पे’च्या मागणीला मान्यता दिल्याचे बगळे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही करण्यास व शासन निर्णय काढण्यासाठी एप्रिलअखेर पर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार व नायब तहसीलदार आज कामावर रुजू होत असल्याचे जिल्हाध्यक्ष आर.एन. देवकर यांनी सांगितले.