भाजपचे 4-5 आमदार राष्ट्रवादीत जाणार; कर्नाटक पक्षाध्यक्षांचा दावा
कर्नाटकमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 40 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे. एवढेच नाही, तर भाजपचे 4 ते 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून ते निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करू शकतात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी केला आहे. हरी आर म्हणाले, “आम्ही आगामी निवडणुकीत किमान 40 जागांवर लढणार आहोत. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार पक्ष प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत. बेंगळुरूचे (माजी) महापौरही लवकरच आमच्या पक्षात सामील होऊ शकतात.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 14 जागांवर निवडणूक लढवली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता काढून घेतली असून त्याला प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होनार असून 13 मे रोजी मतमोजनी होईल.
काँग्रेसची तिसरी यादी जाहीर –
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केली. यात ४३ मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेत. १२४ उमेदवारांची यादी काँग्रेसने २५ मार्चला जारी केली होती. यानंतर ४२ उमेदवारांची यादी ६ एप्रिलला जारी करण्यात आली होती. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार डीके शिवकुमार कनकापुरा आणि सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सिद्धरामय्या यांनी कोलारमधून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली होती. परंतू तिथून कोथुर्जी मंजुनाथ यांना उमेदवारी देण्य़ात आली आहे.