बहुउद्देशीय नागरी पतसंस्थेत ‘परिवर्तन’ अटळ
३२ वर्षांनंतर होणार खांदेपालट
विकास, डिजिटल बँकिंग आणि नव्या योजनांवर देणार भर
दि4वि.प्रजासत्ताक अमरावती
रुक्मिणी नगर येथील बहुउद्देशिय नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक ६ मे रोजी होणार असून त्यासाठी तब्बल ३२ वर्षांनंतर विद्यमान प्रस्थापित मंडळीच्या विरोधात संस्थेच्या विकासाचा अजेंडा घेऊन परिवर्तन पॅनेलने निवडणुकीत उडी घेतली आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे कंटाळलेल्या सभासदांनी परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा दिल्याने आता बहुउद्देशिय नागरी सहकारी पतसंस्थेत ‘परिवर्तन’ अटळ मानले जात आहे.
सर्वसामान्य सभासदांच्या पाठिंब्याने उभ्या झालेल्या परिवर्तन पॅनलच्या वतीने दिलीप झाडे, राजेंद्र ठाकरे, प्रफुल्ल धवळे, अरविंद रोहनकर, राजेश शंके, गणेश गावंडे हे निवडणूक लढवीत आहे. विशेष म्हणजे परिवर्तन पॅनेलने सुरुवातीपासून पतसंस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून जवळपास सर्व मतदार बंधू भगिनीपर्यंत परिवर्तन पॅनेलचे उमेदवार पोहोचले आहेत. विद्यमान संचालकांचे प्रगती पॅनल देखील या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी आपले शक्ती पणाला लावत असून त्यांना मात्र मतदारांकडून निरनिराळ्या प्रकारे नकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून जैसे थे स्थितीतच संस्थेला ठेवणाऱ्या मंडळींना आता सभासदांनी नाकारले असून त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचे मानले जात आहे.
६ मे रोजी रुक्मिणी नगर परिसरातील मराठा विवाह मंडळाच्या सभागृहात सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यन्त ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी संपूर्ण नियोजन दोन्ही बाजूने झाले आहे. एकीकडे ज्येष्ठ मंडळीचे पॅनल आणि दुसरीकडे बँकेचा विकासाचा अजेंडा, बँकेचे संपूर्ण संगणकीकरण, नवीन कर्ज योजना, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज योजना, कर्मचाऱ्यांसाठी तातडीची कर्ज योजना, सोने तारण कर्ज योजना, गृह कर्ज योजना अशा अन्य योजनेसह डिजिटल बँकिंग, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, नवीन शाखा असे धोरण ठेवून परिवर्तन पॅनल मतदार बांधवांपर्यंत पोहोचले आहे. एकंदरीत या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलची बाजू सध्या प्रचंड भक्कम असून अनेक नाराज तसेच बँकेच्या विकासाचा विचार करणाऱ्या मंडळींचा पाठिंबा सध्या परिवर्तन पॅनलच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.