‘ट्रायबल’आश्रमशाळांच्या गुरूजींची होणार परीक्षा; तपासणार क्षमता
आदिवासी विकास आयुक्तांचा निर्णय, शैक्षणिक धोरणाच्या रोड मॅपसाठी ‘ॲक्शन प्लॅन’
अमरावती :
आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यरत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता तपासली जाणार आहे. त्याकरिता गुरूजींची परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. आदिवासी विद्यार्थ्याच्या भविष्यकालीन शैक्षणिक धोरण निश्चितीसाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी घेतला आहे. त्याअनुषंगाने ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्तांना निर्देशीत करण्यात आले आहे.
‘ट्रायबल’च्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिगत व्हावे आणि त्यांना स्वयंअध्ययनाची आवड निर्माण व्हावी. स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी आणि विद्यार्थ्यांचे चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित करण्याच्या हेतुने क्षमता परीक्षा १७ सप्टेबर रोजी घेण्याचे नियोजन आहे.मात्र, काही शिक्षक संघटनांनी क्षमता परीक्षांना विरोध दर्शविला असला तरी गुरूजींना ही परीक्षा अनिवार्य स्वरूपाची केली आहे. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांचे किती शिक्षक ही परीक्षा देऊन क्षमता सिद्ध करतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना द्यावी लागेल परीक्षा
आदिवासी विकास विभागातील शासकीय, अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत पहिली ते बारावीपर्यंच्या शिक्षकांना एससीईआरटी/ एनसीईआरटी पाठ्य पुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारीत क्षमता परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षांच्या माध्यामातून शिक्षकांची क्षमता पुढे येणार आहे. बदलत्या काळानुसार ‘ट्रायबल’चे शिक्षकांमध्ये अध्ययनात बदल घडवून आणला जाणार आहे.
गुरूजी नापास झाले तरीही कारवाई नाहीच?
आदिवासी विकास विभाग आश्रमशाळांच्या गुरूजींची परीक्षा घेणार आहे. मात्र या परीक्षेत गुरूजी नापास झाले तरी त्यांच्याविरूद्ध कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई करण्यात येणार नाही, ही बाब आयुक्तांनी स्पष्ट केली आहे. तसेच क्षमता चाचणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन शिक्षकांना प्रकल्प स्तरावर गौरविण्यात येणार आहे.
शिक्षकांनी क्षमता परीक्षा निर्भिडपणे द्यावी. यात प्रशासनाचा चांगला उद्देश आहे. विषयांना अनुसरून प्रश्नावली असणार आहे. यात घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. शिक्षकांच्या क्षमतेवरुनच आदिवासी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक धोरणाच्या रोड मॅप तयार केला जाणार आहे. क्षमता चाचणी हा त्यातील एक भाग आहे.
– सुरेश वानखेडे, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.