विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला साथ देणार नाही
अचलपुरातील शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेने खळबळ
अचलपूर
महाविकास आघाडीचे कार्यक्रम अथवा आंदोलन करताना काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाही, असा आरोप करीत येत्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला साथ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी घेतली. पत्रपरिषद घेऊन त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.शिवसेनेच्या या भूमिकेने मात्र राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
अचलपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांना साथ देणार नाही, अशी भूमिका घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू पत्रकार परिषदेमध्ये मांडली. या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना नेते ओमप्रकाश दीक्षित, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तमराव होम, नरेंद्र फिसके, नरेश भाकरे, विलास सोळंके, सागर वाटणे, पंकज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी सांगितले की, लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखडे यांना शिवसेनेमुळे यश आले. परंतु त्यानंतर काँग्रेसने शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांना कधीही विश्वासात घेतले नाही. नुकतेच झालेले जोडे मारो आंदोलन हे सुद्धा काँग्रेसच्या नावावर घेण्यात आले. काँग्रेसचे उमेदवार कोणत्याही कार्यक्रमांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना बोलावित नाही. त्यामुळे अचलपूर मतदारसंघात शिवसेना स्वतंत्र उमेदवार देणार या प्रकारची भूमिका पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आली.