
आपले सरकार पोर्टल 2.0 बाबत जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांना प्रशिक्षण
नागरिकांच्या तक्रारींचे गुणवत्तापूर्ण निराकरण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल उपयुक्त
– जिल्हाधिकारी सौरभ कटियार
विदर्भ प्रजासत्ताक
दि.९अमरावती,
सर्वसामान्य नागरिक हा आपल्या शासन, प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या तक्रारींचे गतीने आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी ‘आपले सरकार पोर्टल 2.0’ ही प्रणाली उपयुक्त आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा निपटारा विहित कालावधीत करण्याला सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिल्या.
आपले सरकार पोर्टल 2.0 प्रणालीच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार बोलत होते. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार वैशाली पाथरे तसेच प्रशिक्षक देवांग दवे, शुभम पै यांच्यासह जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
नागरिक आणि प्रशासन यांच्यात ऑनलाईन संवादाच्या माध्यमातून सेतू निर्माण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तक्रारींचा निपटारा गतिमान होण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या संकल्पनेतून आपले सरकार पोर्टलबाबत राज्यभर जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावी वापर कशाप्रकारे करावा, याबाबत यावेळी माहिती दिली गेली. या माहितीचा वापर प्रत्यक्ष कामकाजात करून नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे जिल्हाधिकारी श्री . कटियार यांनी सांगितले.
नागरिकांना आपल्या तक्रारी घरातून, गावातूनच शासन, प्रशासनापर्यंत पोहचविता याव्यात, यासाठी आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आले. आता नागरिक आणि शासकीय यंत्रणांसाठी सुसह्य ठरतील, अशा सुधारणा करून ‘आपले सरकार पोर्टल 2.0’ हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कामकाजातील पारदर्शकता वाढविण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे, असे प्रशिक्षक देवांग दवे यांनी सांगितले. तसेच शासकीय कार्यालये, नागरिकांना या पोर्टलचा कशाप्रकारे वापर करता येईल, याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.