.
राज्य शासनाने संचमान्यता, कंत्राटी पद्धतीने भरती, आधार कार्ड आधारित शिक्षक निश्चिती संबंधाने निर्णय रद्द करण्यासाठी प्राथमिक संघटना संघर्ष तीव्र करणार…
प्राथमिक शिक्षक संघटनांचा निर्धार..
२५सप्टेंबरला राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अमरावती दि.१५-
शासनाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणाविरोधात राज्यातील शिक्षक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या बैठकीत शनिवारी (१४ सप्टेंबर) घेण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. दुसरीकडे १५ मार्च संचमान्यता व २० अथवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील एक शिक्षक पद बंद करून कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय (५ सप्टेंबर २०२४) घेतला आहे. या दोन्ही निर्णयाच्या परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षणच बंद होण्याची स्थिती आहे. बालकांना दर्जेदार शिक्षणापासून दूर लोटण्याच्या निर्णयास सर्व क्षेत्रातून विरोध होणे गरजेचे आहे.
विद्यार्थी शाळेत दाखल आहे मात्र काही विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र नसल्याने आधार कार्ड निघत नाही. मात्र या वास्तवाकडे दुर्लक्ष करून आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच निर्धारणासाठी व योजनांच्या लाभासाठी ग्राह्य न धरण्याची शासनाची भूमिका अचंबित करणारी आहे. अशाप्रकारच्या शासन धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा बंद करून खाजगीकरण करणे आणि विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या दर्जेदार शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या शासन धोरणासाठी हानून पाडण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी निर्धार केला आहे.
या संबंधाने पुणे येथे शिक्षक भवनात प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता.१४ सप्टेंबर) संपन्न झाली. मंगळवार दि. १७ सप्टेंबर पासून शिक्षकांनी काळी फीत लावून विरोध प्रदर्शन करणे. बुधवार दि. १८ सप्टेंबर पासून WhatsApp च्या कथीत प्रशासनिक गृपमधून बाहेर पडून असहकार सुरू करणे. दि. २५ सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकानी रजेवर जात प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणे अशाप्रकारे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासनाकडे नोटीस पाठविण्यात येणार आहे.
प्राथमिक शिक्षक संघटना निर्धार बैठकीचे अध्यक्षस्थानी शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) राज्याध्यक्ष केशवराव जाधव होते. मार्गदर्शक म्हणून शिक्षक नेते संभाजीराव थोरात, उदयराव शिंदे होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी प्रास्ताविक केले. पुरोगामी शिक्षक समितीचे प्रसाद पाटील, शिक्षक परिषदेचे राजेश सुर्वे,आदर्श शिक्षक समितीचे शिवाजीराव साखरे, आखिल भारतीय शिक्षक संघाचे किरण पाटील, शिक्षक सेनेचे चिंतामणी वेखंडे, शिक्षक भारतीचे नवनाथ गेंड, पदवीधर शिक्षक संघटनेचे अनिल पलांडे, मनोज मराठे, पंजाबराव देशमुख संघटनेचे प्रभाकर झोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सतिश कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे यादव पवार, शिक्षक सहकार संघटनेचे निलेश देशमुख, ऊर्दू शिक्षक संघटनेचे साजीद अहमद, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तुषार पाटील व शहाजी गोरवे, एम एड् कृती समितीचे राजू सावकार जाधव, इब्टा शिक्षक संघटनेचे उतरेश्वर मोहलकर, महाराष्ट्र शिक्षक समन्वय महासंघ मधुकर काठोळे, एकल शिक्षक सेवा मंचचे विकास खांडेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राजन कोरगांवकर, राजन सावंत, पल्लवी गायकवाड, प्रकाश घोळवे, अंकुश काळे, पवन सुर्यवंशी, एस के पाटील, संजय नाईक, संजय जाधव, तुषार पाटील, शशिकांत पोवार आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ताज्या बातम्यांचे अपडेट साठी रहा आमच्या सोबत @ दैनिक विदर्भ प्रजासत्ताक ,वेब न्यूज