राहुल गांधींची जीभ कापणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस; संजय गायकवाड यांची प्रक्षोभक घोषणा
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१६बुलढाणा
काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळून आला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच, राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, अशी प्रक्षोभक घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारतात उमटण्याची चिन्हे आहे.
आज बुलढाणा येथे निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलतांना आमदार संजय गायकवाड यांनी हे स्फोटक विधान केले. राहुल गांधी यांच्या कथित आरक्षणविरोधी विधानामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण संपवायचे आहे. राज्यात आणि भारत देशात आरक्षणावरून आग भडकवली असताना राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन हे विधान करून आपली आरक्षणविरोधी भूमिका मांडली आहे.
याचा अर्थ त्यांना आरक्षण संपवायचे आहे. दलित, आदिवासी, ओबीसी यांना इतरांसमवेत, पुढारलेल्या जातींसोबत येण्याची, आर्थिक-शैक्षणिक प्रगती साधण्याची संधी मिळावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमाने आरक्षण दिले आहे. मात्र राहुल गांधी यांनी विदेशी भूमीवर आरक्षण विरोधी। भूमिका मांडली आहे. या राहुल गांधीची जीभ छाटणाऱ्याला माझ्याकडून अकरा लाख रुपयांचे रोख बक्षीस देईल या स्फोटक विधानाचा आमदार संजय गायकवाड यांनी चर्चेदरम्यान पुनरुच्चार केला. लोकसभा निवडणुक प्रचारात याच नेत्याने आणि त्यांच्या। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने , भारतीय जनता पार्टी केंद्रात पुन्हा सत्तेत आली तर संविधान बदलतील, आरक्षणाला धोका आहे, असा फेक नरेटिव्ह तयार केला होता. आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी भूमिका मांडली असून त्यांचा दलित आदिवासी बदलचा कळवळा वरवरचा असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी यावेळी केला.
——————————————————–