भारतीय हॉकी संघाने घडवला इतिहास,
चीनचा पराभव करत पटकावले आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी
विदर्भ प्रजासत्ताक
भारताच्या हॉकी संघाने चीनचा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ विक्रमी पाचव्यांदा आशियाई ट्रॉफीचा पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताकडून जुगराज सिंगने एक गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. चीनने अखेरच्या सेकंदापर्यंत गोल करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय खेळाडूंनी कडवी झुंज देत विजय आपल्या नावे केला. चीनने पहिल्यांदाच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर पाकिस्तानच्या संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करत तिसरे स्थान मिळवले.
भारतीय हॉकी संघाने लागोपाठ दोन वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. याआधी उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने कोरियाचा ४-१ असा पराभव केला होता. उपांत्य फेरीत कोरियन संघाविरुद्ध हरमनप्रीत सिंग, उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंग यांनी गोल केले. कर्णधार हरमनप्रीतने एकूण दोन गोल केले होते. हरमनप्रीत सिंगने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, यासाठी हरमनप्रीतला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताबही मिळाला.भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या टूर्नामेंटमध्ये अपराजित राहिलेल्या भारतीय हॉकी संघाने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी, भारताने २०११, २०१६, २०१८ (पाकिस्तानसह संयुक्त विजेते) आणि २०२३ मध्ये ट्रॉफी जिंकली होती.