‘राहुल गांधींची जीभ छाटू नये, चटके द्यायला हवे’- खा. अनिल बोंडे
अमरावती
राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या मुद्द्यावरुन सध्या वाद सुरु आहे. याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देईन,’ असे वादग्रस्त विधान केले. संजय गायकवाड यांच्या या विधानावरुन काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला तसेच गायकवाड यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. अशातच राहुल गांधींची जीभ छाटू नये,त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे’ असे खळबळजनक विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकराला बक्षीस देणार असे वादग्रस्त विधान केले होते. संजय गायकवाड यांच्या या विधानावरुन काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान ताज असतानाच आता भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या विधानासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे, विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची ‘जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे’ अशा लोकांना जिभेला चटके देणे आवश्यक आहे, असे वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केले आहे.तसेच राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत असे म्हणत भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी ज्ञानेश महाराव श्याम मानव यांच्यावरही टीका केली आहे. भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ‘जीभ छाटू नये तर जिभेला चटके’ मात्र निश्चितच दिले पाहिजे असा पुनरउल्लेख सुद्धा डॉ. अनिल बोंडे यांनी केला. दरम्यान, संजय गायकवाड यांच्या विधानावरुन वाद सुरु असतानाच आता अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याने काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.