आरक्षणविरोधी चेहरा झाकण्यासाठी भाजपकडून खा. राहुल गांधी टार्गेट:
काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा केला पलटवार
यवतमाळ
या देशात निवडणूक आयोगासह केंद्रीय तपास यंत्रणा, तसेच सर्वच घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन भाजपच्या गत दहा वर्षांच्या सत्ता कालखंडात झाले. आरक्षणविरोधी भूमिका घेण्यात भाजप नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागलो. एकंदरीत भाजपचा आरक्षणविरोधी मूळ चेहरा झाकण्यासाठी आता या पक्षातील नेत्यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून आरक्षण प्रेमाचा पुळका दाखविणे सुरू केले आहे, असा आरोप करत देशातील जनता सुज्ञ असून भाजपचे मूळ रूप त्यांना ठाऊक असल्याचे अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस माणिकराव ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वार े म्हटले आहे.
सध्या देशात राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वाशिंग्टन डीसी येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावरील उत्तराचा विपर्यास करून भाजपने रान उठविले आहे. या प्रकरणात ठाकरे म्हणाले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी हे अमेरिकेतील वाशिंग्टन डीसी या महाविद्यालयात गेले होते. तेथील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. दरम्यान, त्यांना या महाविद्यालयातील अपूर्वा रामास्वामी या विद्यार्थिनीने भारतात जातीगत आरक्षण किती काळ राहील? हा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना खा. राहुल गांधी म्हणाले की, जोपर्यंत भारतात जातीयवाद आहे, सामाजिक विषमता आहे, तोपर्यंत देशात आरक्षण असेल. ज्या दिवशी भारतातील जातीयवाद संपेल, सामाजिक समानता येईल, तेव्हा आरक्षण समाप्त करण्याचा विचार होऊ शकतो.
लोकसभेच्या निवडणुकीत देशातील घटनात्मक संस्थांच्या अवमूल्यनामुळेच भाजपला विशेषत: महाराष्ट्रात मोठा फटका बसला. घटना, आरक्षण हे मुद्दे नेहमी भाजपच्या नेते व या पक्षाच्या विचारधारेशी निगडीत असलेल्या मंडळींनी संपविण्याचीच भाषा केली आहे. त्यामुळे आरक्षणाचा हा विषय आपल्याकडे कसा ओढता येईल व जनतेला आमचा पक्ष किती घटना व आरक्षणप्रेमी आहे, हे दाखविता येईल, यासाठी गांधी यांना टार्गेट केले जात असल्याचा आरो ठाकरे यांनी केला आहे.