संजय राऊत यांना धर्मवीर आठवत नाहीत:
ते नमाज पठणासाठी कुठे जातात हे शोधावे लागेल, भाजप खासदाराची जहरी टीका
अमरावती
संजय राऊत काय बोलतील याचा नेम नाही. त्यांचे धर्म परिवर्तन झाल्याने त्यांना धर्मवीर आठवत नाहीत. त्यांना औरंगजेब आणि टिपू सुलतान आठवत असतील. फक्त ते नमाज पठण करण्यासाठी कुठे जातात, हे शोधावे लागेल, अशी जहरी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. नागपूर येथील कोराडी संस्थानाला शासनाकडून अल्प दरात भूखंड मिळाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लोबोल केला होता. यावरून अनिल बोंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधकांकडून सातत्याने हिंदू संस्थानांबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. नागपूरचे कोराडी संस्थान हे खूप जुने संस्थान असून अनेकांचे ते कुलदैवत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांना केवळ एक रुपयांत शिक्षण देते. संजय राऊत, नाना पटोले, अनिल देशमुख हे कोरोडी माते संदर्भात बोलत आहेत. ती यांची पण माता आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी नागपुरात किती जमिनी हडप केल्या? सतीश चतुर्वेदी यांनी किती हेक्टर जमीन लाटली? असा सवाल करत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पैसे जमा करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.
मुस्लिम संस्थाकडे दुर्लक्ष आणि समाजकार्य करणाऱ्या संस्थांवर आरोप
पुढे बोलताना अनिल बोंडे म्हणाले ही, माझ्याकडे मुस्लिम संस्थांची यादी आहे. त्या शैक्षणिक संस्था असून देखील तिथे आरक्षण लागू होत नाही. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. याउलट अन्नछत्र चालवणाऱ्या कोराडी मातेच्या संस्थानावर आरोप करतात. हे संस्थान एका कुटुंबाचे नाही. चंद्रशेखर बावनकुळे संस्थानाचे अध्यक्ष आहेत. दर दोन वर्षाला या अध्यक्षांची निवड केली जाते. याआधी दुसरे अध्यक्ष होते. तरीही या संस्थानाविरोधात खोटे आरोप करून बदनामी करत आहेत.
संजय राऊत नमाज पठणासाठी कुठे जातात याचा शोध घ्यावा लागेल
अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावरही जहरी टीका केली आहे. संजय राऊत काय बोलतील हे सांगता येत नाही. त्यांचे धर्मपरिवर्तन झाल्यामुळे त्यांना धर्मवीर कधीच आठवणार नाही. त्यांना औरंगजेब आणि टिपू सुलतान आठवतील. ते नमाज पठणासाठी कुठे जातात, हे शोधावे लागेल, असे बोंडे म्हणाले.
त्या महिलेला कुणी पाठवले होते का?
एका महिलेकडून काल मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. त्यावरही अनिल बोंडे यांनी भाष्य केले आहे. त्या महिलेचे दु:ख जाणून घेऊन तिचे समुपदेश करायला हवे. असे कृत्य करण्यासाठी तिला कुणी पाठवले होते का? याचा शोध मंत्रालय प्रशासनाने घ्यावा, असे बोंडे म्हणाले.
ताज्या बातम्यांचे अपडेट व अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचण्यासाठी आजच आमच्या सोबत जॉईन व्हा