खासदार सुनील तटकरेम्हणतात “लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळते करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसणार. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य खड्ड्यात घातले जात असेल तर हे चुकीचे आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी निशाणा साधला.
महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे काय बोलले? याबाबत मला काही माहिती नाही. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वार्थी आहे, असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान आहे असे मानतो. आता राज ठाकरे नेमकी कोणत्या हेतूने बोललेत हे मला माहिती नाही. पण तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून बोलत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांचे जर ते वाक्य असेल तर ते योग्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी केला.