राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू,
अज्ञात व्यक्तींनी तीन गोळ्या झाडल्या
मुंबई :
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
कोण आहेत बाबा सिद्दीकी?
झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेय. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.