झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले…
मुंबई
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात एक खळबळजनक अपडेट येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्यासोबत शनिवारी रात्री आमदार मुलगा झिशान सिद्दिकी यांचीही हत्या करण्याची कट रचण्यात आला होता. परंतू, एक फोन कॉल आला आणि झिशान सिद्दिकी वाचल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलिवुड आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लॉरेन्स गँगने ही हत्या घडवून आणली आहे. यासाठी सुपारी देण्यात आली होती. तिघेजण गेल्या महिनाभरापासून कुर्ल्यामध्ये रहायला आले होते. सिद्दिकी यांच्या घराची, ऑफिसची रेकी करण्यात आली होती. यानंतर शनिवारी सायंकाळी देवीच्या विसर्जनाच्या फटाक्यांच्या आवाजात सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
शनिवारी सायंकाळी बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी हे बांद्र्याच्या निर्मलनगरमधील ऑफिसमध्ये बसलेले होते. फटाक्यांची आतिषबाजी झाल्यावर सिद्दिकी घरी जाणार होते. यानंतर ते ऑफिसमधून निघाले. फटाके सुरु असल्याने त्यांची कार तिथेच थांबली. तिथे तिघेजण आले, त्यांचा चेहरा झाकलेला होता. त्यांनी सिद्दिकी यांच्यावर गोळ्या चालविण्यास सुरुवात केली. सिद्दिकी यांच्या डोक्याला गोळी लागली होती. तिथेच ते गतप्राण झाले होते.
झिशान सिद्दिकी देखील बाबा सिद्दिकींसोबत घरी जाणार होते. ते ऑफिसबाहेर निघालेच होते इतक्यात झिशान यांना फोन आला व ते पुन्हा ऑफिसमध्ये गेले. फोनवर बोलत असताना त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकायला आला. ते बाहेर आले तर त्यांचे वडील जमिनीवर पडलेले होते व जमाव हल्लेखोरांना पकडत होता. फोन आला नसता तर झिशान सिद्धिकी देखील हल्लेखोरांच्या कचाट्यात आले असते, असे या सुत्रांनी एनबीटीला सांगितले आहे.