आ. बच्चू कडू यांची सर्जिकल स्ट्राईक
युवा स्वाभिमान पक्षाचे जितू दुधाने यांचा प्रहारमध्ये प्रवेश
विदर्भ प्रजासत्ताक
अचलपुर
काही दिवसांपूर्वी प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे शिवसेना शिंदे गटात गेल्याने मोठी खळबळ निर्माण झाली होती मात्र बच्चू कडू यांनी थेट बडनेरा मतदार संघाचे आ. रवी राणा यांच्या घरात सर्जिकल स्ट्राईक करून आ. रवी राणा यांच्या विजयाचे शिल्पकार असलेले तसेच राणा दाम्पत्याचे राजकीय नियोजन करणारे युवा स्वाभिमानचे कोअर कमिटीचे पदाधिकारी जितू दुधाने यांना शुक्रवारी प्रहार पक्षात प्रवेश दिला. जितू दुधाने यांचा प्रहार पक्ष प्रवेश झाल्याने रवी राणा यांचे राजकीय गणित विस्कटले असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांनी केला आहे.
जितू दुधाने १७ वर्षांपासून युवा स्वाभिमान पक्षात कार्यरत असून रवी राणा यांच्या राजकीय प्रवासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपला कोअर कमिटी पदाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आ. रवी राणा यांच्याकडे सुपूर्द केला.युवा स्वाभिमान पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांची होत असलेली कोंडी तसेच नव्या कार्यकर्त्यांना मान आणि अनेक वर्षांपासून युवा स्वाभिमान पक्षात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक याशिवाय रवी राणा यांचे बंधू सुनील राणा यांचा कार्यकर्त्यांवर वाढत असलेला दबाव याला कंटाळून जितू दुधाने यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता.
शुक्रवारी अचलपूर येथे प्रहार पक्षाच्या वतीने आयोजित महाराष्ट्राची हस्यजत्रा या कार्यक्रमात थेट आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जितू दुधाने यांनी प्रहार पक्षात प्रवेश करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे रवी राणा आणि बच्चू कडू यांचे राजकीय वैर सर्वश्रुत असतांना राणा यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्याने थेट प्रहार पक्षात प्रवेश घेणे म्हणजे रवी राणा यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला एकप्रकारे आव्हान देण्यासारखे आहे.आ. बच्चू कडू यांनी जितू दुधाने यांना सन्मानाने प्रहार पक्षात प्रवेश देऊन त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. जितू दुधाने हे यांना राजकारणातील मॅनेजमेंट गुरू संबोधले जाते. या मॅनेजमेंट गुरूमुळे आ. बच्चू कडू यांना भविष्यातील राजकारणात चांगलाच फायदा होईल मात्र रवी राणा यांची नौका तरणार की बुडणार याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचेही पानिपत
अचलपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाचेही पानिपत सुरू असून काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष तथा अनुसूचित जाती सेल चे तालुका अध्यक्ष , सुरळी गावाचे कर्तव्यदक्ष उपसरपंच शैलेश निरगुडे यांनी सुद्धा शुक्रवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार पक्षात प्रवेश केला.शैलेश निरगुडयांच्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात प्रहारची आणखी ताकद वाढली आहे.
———————————————–
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचा आता दररोज आमच्या सांध्य मराठी विदर्भ प्रजासत्ताक मध्ये
अमरावती येथून नियमित प्रकाशित
अमरावती येथून नियमित प्रकाशित