काँग्रेसच्या पुढाकाराने आघाडीतील वादावर तोडगा?:रमेश चेन्नथला मातोश्रीवर;
आज पुन्हा चर्चोला सुरुवात होणार
मुंबई
महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत असलेला पेच सुटण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे मधल्या काळात रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. मात्र आता त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडीची प्रकृती देखील चांगली असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.
जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली होती. या वादामुळे नाना पटोले चर्चेसाठी असतील तर आम्ही चर्चेला जाणार नाही, अशी थेट भूमिका उद्धव ठाकरे गटाने घेतली होती. या दोन्ही पक्षांमध्ये असलेला वाद अखेर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर पुन्हा महाविकास आघाडीतील जागा वाटपास संदर्भातील चर्चा सुरू होणार आहे. अशी माहिती चेन्नीथला यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
विदर्भातील जागांवरुन झाला होता वाद
नाना पटाले हे विदर्भातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत. त्यामुळे विदर्भातील जास्तीत जास्त जागा या काँग्रेसने लढवाव्यात अशी मागणी ते करत आहेत. त्याचाच विदर्भामध्ये ठाकरे गटाला देखील विस्तार करायचा असल्याने शिवसेना जास्तीत जास्त जागा मागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता उद्धव यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद झाल्याचे समोर आले होते.
मुख्यमंत्री पदाच्या दावेसाठी हवे जास्त आमदार
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोणाचा होईल? याबाबत तिन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असा फार्मूला शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे गट दोघांनाही जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत. मुख्यमंत्री पदाच्या दाव्यासाठीच दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपात रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे.