प्रशासन कठोर ; रात्री १० वाजतानंतर लाऊडस्पिकर वाजले तर होणार कारवाई
पोलिसांची परवानगीही बंधनकारक : सकाळी सहापासून मिळतेय परवानगी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.९ अमरावती
अमरावती जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून २५ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. ही निवडणूक विना अडथळा व शांततेने पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या काळात लाऊडस्पीकर वापरण्यावर आयोगाने निर्बंध घातले आहेत. या नियमानुसार रात्री १० वाजतानंतर लाऊडस्पीकर लावल्यास कारवाई होऊ शकते. यासाठी तहसील व पोलिस प्रशासनाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणूक कालावधीत उमेदवारांकडून शहर तसेच ग्रामीण भागातही लाऊडस्पीकरद्वारे प्रचार यंत्रणा राबविली जाते. याच अनुषंगाने निवडणूक आयोगाने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील आठ ही विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत कोणत्याही वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच तोही संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी यांची रीतसर परवानगी घेऊनच करता येणार आहे.
वाहन चालू ठेवून ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्वप्रकारच्या ध्वनिक्षेपकाच्या वापरास वाहनावर बसवून किंवा अन्य प्रकारे दररोज सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहील. सर्व
राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निवडणुकीतील उमेदवार किंवा ध्वनिक्षेपकाच्या वापराचे परवानगी विवरण मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक राहील.
२५ नोव्हेंबरपर्यंत आदर्श आचारसंहिता
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याचे कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हा आदेश १५ ऑक्टोबरपासून तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लागू राहणार आहे.
निवडणूक पथकाची राहणार करडी नजर
• निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा तसेच निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासंबंधीचे नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पथक तयार करण्यात आले आहे. पथक कारवाईचा बडगा उगारणार आहेत.
• रात्री १० वाजतानंतर लाऊडस्पीकर लावल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे. यासाठी पोलिस प्रशासन लक्ष ठेवून राहणार आहे. तक्रारीची वाट न बघता थेट ते कारवाई करणार आहे. त्यामुळे लाऊडस्पीकर लावताना योग्य काळजी घेणे बंधनकारक आहे.