योगी आदित्यनाथांचे खर्गेंना सडेतोड प्रत्युत्तर
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१२ अचलपुर
भगवे कपडे परिधान करणाऱ्या योगींसाठी देश प्रथम येतो. तर काँग्रेस सत्तेसाठी तुष्टीकरण महत्वाचे वाटते अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ते आज, मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे आयोजित सभेत बोलत होते.
काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे नुकतेच झारखंडमधील एका सभेत ते म्हणाले होते की, अनेक साधू आता राजकारणात आले आहेत आणि भगवे कपडे घालून समाजात द्वेष पसरवत आहेत. ‘बटेंगे तो,कटेंगे’ असे विधान कोणताही संत देऊ शकत नाही. अशी विधाने दहशतवादी करू शकतात, कोणताही संत असे बोलू शकत नाही असेही खर्गे म्हणाले होते. खर्गेंनी केलेल्या टीकेवरून संत समाज आणि राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत. अशातच मंगळवारी अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. योगी म्हणाले की, “मी योगी आहे आणि योगींसाठी देश प्रथम येतो. तर मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेससाठी तुष्टीकरण सर्वात महत्त्वाचे आहे. गेल्या 3 दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष माझ्याबद्दल नकारात्मक बोलत आहेत, मी म्हणतो, योगींसाठी देश प्रथम येतो, परंतु तुमच्यासाठी काँग्रेसचे तुष्टीकरण प्रथम येते. याप्रसंगी योगींनी सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे यांचे गाव एकेकाळी हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली होते. भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली असताना काँग्रेसचे नेतृत्व मुस्लिम लीगच्या पाठीशी उभे होते आणि त्याच काळात मुस्लिम लीग आणि निजामाच्या रझाकारांनी हिंदुंचे शिरकाण केले होते. याच आगीत मल्लिकार्जुन खर्गे यांचे गावही जळून खाक झाले, ज्यात खर्गेंची आई, बहीण आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाला होता. परंतु, आपल्या कुटुंबाच्या बलिदानाबद्दल खर्गे कधीच काही बोलत नाहीत, कारण खरे बोलल्यासकांग्रेसला मिळणाऱ्या मुस्लिम मतांमध्ये घट होईल हे त्यांना माहीत आहे असा टोला योगींनी लगावला. खर्गेंनी आपल्या आयुष्यात ‘बटेंगे तो,कटेंगे’ या विधानाचा प्रत्यय घेतला आहे. तेव्हा खर्गेंनी जनतेला सत्य सांगून ‘बटेंगे तो,कटेंगे’ चे महत्व विषद करण्याची गरज असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.