नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
गुडधे यांच्याकडून गल्लीबोळात प्रचारावर भर : लोकसभेनंतर भाजप ॲक्शन मोडवर
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१४ नागपूर
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात उपमुख्यमंत्री व पक्षाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस व कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यात प्रमुख लढत आहे. या जागेवरून फडणवीस यांना विजयी चौकाराची व आमदारकीच्या डबल हॅटट्रीकची संधी आहे. फडणवीस यांच्याकडे राज्यभरातील प्रचाराची धुरा असल्याने ते स्वत:च्या मतदारसंघात संपर्कासाठी हवा तसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भरवशावरच प्रचार मोहीम सुरू आहे. दुसरीकडे होर्डिंगबाजीमुळे चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यासोबत कार्यकर्त्यांकडून गल्लीबोळात जाऊन प्रचारावर भर देण्यात येत आहे. एकूणच या हायप्रोफोईल लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विजयी चौकार तसेच आमदारकीच्या डबल हॅटट्रीकची संधी आहे. मात्र २०१९ ची विधानसभा व लोकसभेतील भाजपच्या घटलेल्या मताधिक्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपचे नियोजन पणाला लागलेले आहे. दुसरीकडे गुडधे यांच्यासमोर अखेरपर्यंत पक्षातील एकजूट कायम ठेवून लढण्याचे आव्हान आहे.
२००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघ तयार झाला, तेव्हापासून येथे भाजपचे प्राबल्य आहे. २०१९ मध्ये फडणवीस यांनी येथून विजयाची हॅटट्रिक केली. राज्याच्या राजकारणात व्यस्त असले तरी फडणवीस हे स्वत: नियमितपणे मतदारसंघाचा आढावा घेतात व अगदी सामान्य कार्यकर्त्याच्या घरीदेखील भेट देताना दिसून आले आहेत. येथे भाजपचे मोठे संघटन असून फडणवीस यांच्या अनुपस्थितीत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार सुरू आहे तर गुडधे यांच्यासाठी कॉंग्रेस संघटन गटबाजी दूर सारून एकजूट झाले आहे. २०१४ साली गुडधे फडणवीस यांच्याकडून पराभूत झाले होते. तेव्हाच्या चुका टाळण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.
वंचित, बसपामुळे मतविभाजन होणार का ?
या मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून विनय भांगे तर बसपाकडून सुरेंद्र डोंगरे उभे आहेत. मतदारसंघात प्रामुख्याने खुला प्रवर्ग, ओबीसी, सिंधी व अनुसूचित जातीच्या मतदारांची लक्षणीय संख्या आहे. पांढरपेशांचा मोठ्या प्रमाणात भरणा असलेल्या या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दिसून येत असली, तरी काही पट्ट्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी व बसपाकडूनही आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये बसपा व वंचित मिळून मतांचा आकडा १६ हजारांच्या आसपास होता हे विशेष.
घटलेले मताधिक्य अन् सक्रिय झालेले कार्यकर्ते
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला अतिआत्मविश्वास भोवला. अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०१९ च्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य २१ हजार ५८१ने घटले. मात्र त्यानंतर संघटनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्यात आले. याशिवाय विविध पातळ्यांवर सातत्याने प्रचाराचा आढावा घेण्यात येत आहे.
विधानसभा २०१९
देवेंद्र फडणवीस (विजयी) – भाजप – १,०९,२३७
आशिष देशमुख – काँग्रेस – ५९,८९३
रवी शेंडे – वंचित बहुजन आघाडी – ८,८२१
विवेक हाडके – बसप – ७,६४६
नोटा : ३,०६४
https://epaper.vidarbhaprajasattak.com या आमच्या साईड ला अवश्य भेट द्या
अमरावती मधून नियमित प्रकाशीत होणारा सांध्य मराठी दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाइलवरच
आमच्या ग्रुपला जॉईन व्हा !