शासकीय खरेदीच्या विलंबाने पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर
विदर्भ प्रजासत्ताक
प्रत्येक तालुक्यात कापसाची खरेदी करण्यात येणार असल्याचे सीसीआयने जाहीर केले असले तरी जिल्ह्यात मात्र सात दिवसांपूर्वी सात केंद्रे सुरू झाली. १५ दिवसांपूर्वी फक्त एक केंद्र धामणगावला सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कापसाला हमीभाव तर दूर, खेडा खरेदीमध्ये कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
कपाशी हे जिल्ह्याचे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने कपाशीचे नुकसान झाल्याने कापसाचे सरासरी उत्पादन कमी येत आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहेच, शिवाय सततच्या पावसाने कपाशीची बोंडसड झाली आहे. लाल्याने दोन वेच्यात उलंगवाडी होईल, अशी स्थिती आहे. वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत, निवडणुकीमुळे कामगारांचा तुटवडा आहे. वेचणीचा दर किलोमागे १० रुपयांवर गेला आहे. त्यातुलनेत कापसाला सात हजारांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडणार की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.
भारतीय कापूस महामंडळाद्वारा ५ नोव्हेंबरला धामणगाव रेल्वे येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले. येथे आतापर्यंत ५०० क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली. अन्य तालुक्यात अद्याप केंद्र सुरू झालेली नाहीत. आठ दिवसांपूर्वी दर्यापूर, येवदा, दर्यापूर, भातकुली, वरूड, नांदगाव पेठ, अंजनगाव सुर्जी येथे सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात आले तर चांदूरबाजार प्रस्तावित असल्याची माहिती आहे. दरम्यान शासन खरेदीला विलंब व विधानसभा निवडणूक प्रचार यासर्व कारणांमूळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मिळेल त्या भावात कापूर विकत आहे.