शिवाजी पार्क किंवा वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार
विदर्भ प्रजासत्ताक
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडं लागलं होतं. अखेर निकाल समोर आला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 133 जागांसह भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीमधील अन्य दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे विधानसभेत विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ देखील महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे नाहीये. विरोधी पक्षनेतेपदासाठी कुठल्याही एका पक्षाला 29 जागांची आवश्यकता आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 15, शिवसेना ठाकरे गटाला 20 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 10 जागा मिळाल्या आहेत. महायुतीनं 231 जागांवर विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला राज्यात एकूण 45 जागाच जिंकता आल्या आहेत.
दरम्यान राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार? पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की भाजपचा मुख्यमंत्री होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न कायम राहणार आहे. तर मुख्यमंत्री हा भाजपचा होणार असल्याचं समोर येत आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की आम्ही तीन्ही पक्ष याबाबत बसून निर्णय घेऊ
दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधीबाबत देखील महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी हा सोमवारी किंवा मंगळवारी होणार आहे. शिवाजी पार्क किंवा वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. महायुतीमधील कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com