महाराष्ट्र आता विकासाच्या वाटेवर अधिक वेगानं धावेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी
विदर्भ प्रजासत्ताक
विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल 230 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. 132 जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचा राज्यात मोठा पराभव झाला आहे. मविआला केवळ 45 जागाच मिळाल्या आहेत. या ऐतिहासिक विजयावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?
आज महाराष्ट्रात विकासवादाचा विजय झाला आहे. आज महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. आज महाराष्ट्रात खोटेपणा, धोका यांचा अत्यंत वाईटपद्धतीने पराभव झाला आहे. ज्यांनी विभाजनाचा प्रयत्न केला ते आज हारले. महाराष्ट्रात नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला आहे. महाराष्ट्राने विकसीत भारताच्या संकल्पाला आणखी मजबूत केलं आहे. आज मी भाजप आणि एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना या ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा देतो. मी एकनाथ शिंदे आमचे परममित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं कौतुक करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांंचं नाव न घेता त्यांना जोरदार टोला लगावला आहे. मध्यंतरी काही लोकांनी आम्हाला धोका दिला, राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्राने त्यांना आज उत्तर दिलं आहे. मित्रांनो आज देशाच्या अनेक राज्यातील पोटनिवडणुकीचे देखील निकाल लागले आहेत लोकसभेत आमचं आणखी एक सीट वाढलं आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानने भाजपला खूप सपोर्ट केला आहे. आसामने पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील आम्हाला यश मिळालं आहे. बिहारमध्ये देखील आमचं समर्थन वाढलं आहे. यावरून एक लक्षात येतं की देशाला आता फक्त विकास पाहिजे. मी महाराष्ट्रातील जनतेचे, मात भगिनींचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्र आता विकासाच्या वाटेवर अधिक वेगानं धावेल असं अश्वासन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com