महाविकास आघाडीचा कलह आला चोहाट्यावर .. काँग्रेस नेत्यांनी अपक्ष “बंड”खोर उमेदवारास पुरविली रसद
यशोमती ठाकूर यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही
शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचा गंभीर आरोप
विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती
जिल्ह्यातील काही काँग्रेस नेत्यांनी आघाडीच्या उमेदवाराचे काम न करता चक्क अपक्ष उमेदवारास आर्थिक रसद पुरवित आघाडीचा धर्म पाळला नसल्याचा गंभीर आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केला असून या कामी माजी पालकमंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे देखील सुनील खराटे यांनी म्हटले आहे.विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपताच सुनील खराटे यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप करीत बॉम्ब गोळा टाकत जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. सुनील खराटे हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. परंतु जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आपल्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती. प्रचारसभा,पदयात्रा, बैठक यासाठी यशोमती ठाकूर आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांना वेळोवेळी निमंत्रण देण्यात आली. परंतु कुठल्याही प्रचारास उपस्थित न राहता त्यांनी मी रिंगणात असलेल्या एका बंडखोर अपक्ष उमेदवार आर्थिक रसद पुरवित अप्रत्यक्षपणे त्यांचा प्रचार केला आणि तो उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले असा गंभीर आरोप सुनील खराटे यांनी केला आहे. प्रचारासाठी येणे होत नसेल तर किमान सोशल मीडियावर आवाहन करणारी एक दोन मिनिटांची बाईट द्यावी अशी विनंती यशोमती ठाकूर यांना केली असता त्यासाठी देखील त्यांना सवड नसल्याचे सुनील खराटे यांनी म्हटले आहे. जिल्ह्याची जबाबदारी घेतलेल्या यशोमती ठाकूर यांनी माझ्याच नव्हे तर अन्य मतदारसंघात देखील जाणे सोयीस्करपणे टाळत आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे सांगून त्याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याला भोगावे लागत असल्याची खंत खराटे यांनी व्यक्त केली. या सर्व प्रकारासंदर्भात आपण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ताईंनी आघाडी नव्हे तर जात धर्म पाळला
महाविकास आघाडीत असताना प्रत्येक घटक पक्षाच्या नेत्याने आघाडी धर्म पाळणे आवश्यक आहे. परंतु स्वतःला जिल्ह्याच्या नेत्या म्हणवून घेणाऱ्या यशोमती ठाकूर यांनी आघाडीच्या उमेदवारास मदत न करता एका बंडखोर अपक्ष उमेदवार आर्थिक मदत करीत आघाडी नव्हे तर जात धर्म पाळला असल्याचा गंभीर आरोप सुनील खराटे यांनी केला आहे. आपली जात व स्वतःच्या हव्यासापोटी यशोमती ठाकूर यांनी स्वतःसह जिल्ह्यातून काँग्रेस संपविली हे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत असून त्यांनी केलेले जातीचे घाणेरडे राजकारण हा आगामी काळासाठी जिल्ह्यासाठी शाप ठरणार असल्याचे सुनील खराटे यांनी म्हटले आहे.
खासदार झाले बिझी
अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यामध्ये शिवसेनेची देखील महत्त्वाची भूमिका असून लोकसभा निवडणुकीत कुणाच्याही निमंत्रणाची वाट न बघता आघाडीचा धर्म पाळत शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम केले. असे असताना खासदार बळवंत वानखडे यांनी दोन-तीन वेळा प्रचार सभा व पदयात्रेसाठी स्वतःहून वेळ दिली.पण त्यांना सवड मिळाली नाही. सोशल मीडियावर बाईट देण्याची विनंती केली असता ती सुद्धा जाणीव पूर्वक टाळली. विशेष म्हणजे शिवसेना व काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना अपक्ष बंडखोर उमेदवाराचे काम करा अशी विनंती देखील खासदारांनी केल्याची माहिती आपणास असल्याचे सांगून आपले लोकप्रिय खासदार खूप बिझी झाले असा टोला सुनील खराटे यांनी लगावला आहे.
त्या म्हणीची आली प्रचिती
जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो, तोच त्या खड्ड्यात पडतो या म्हणीची प्रचिती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आल्याचे सुनील खराटे यांनी म्हटले आहे. आपल्या विरोधात उभ्या असलेल्या बंडखोर उमेदवारास मदत करीत यशोमती ठाकूर यांनी माझा पराभव व्हावा यासाठी खड्डा खोदला, पण त्या खड्ड्यात त्या स्वतः पडल्या असे सांगून जैसे ज्याचे कर्म ,तैसे फळ देतो ईश्वर असा हल्लाबोल सुनील खराटे यांनी केला आहे.
https://epaper.vidarbhaprajasattak.com