भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातील अनेकांना लागू शकते मंत्रिपदाची लॉटरी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२५नागपूर –
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महायुतीतील विजयी झालेल्यांपैकी अनेक उमेदवारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यात आमदारकीची तिसरी आणि चौथी टर्म असलेल्यांचा दावा जरा मजबूत असला तरी जातीय समीकरण बघूनचं मंत्रिमंडळात आमदारांना स्थान मिळेल याची काहींना आशा आहे.
विदर्भातील एकूण ६२ पैकी ३९ जागी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामध्ये असे काही आमदार आहेत ज्यांची तिसरी, चौथी किंवा पाचवी टर्म आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सहव्यांदा विधानसभेत निवडून गेले आहेत, तर कृष्णा खोपडे, चंद्रशेखर बावनकुळे यांची चौथी टर्म आहे. समीर कुणावार, पंकज भोयर, समीर मेघे, आशिष जैस्वाल, रवी राणा, संजय कुटे यांची हॅट्ट्र्रिक झाली आहे. त्यामुळे ते मंत्रपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. पूर्व विभागात यांची नावं चर्चेत आहेत.
पश्चिम विदर्भातील दावेदार –
पश्चिम विदर्भात बडनेरा विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा विजयी झालेले रवी राणा यावेळी मंत्रिपदाचे दावेदार असून अमरावती विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सुलभा खोडके या देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये अमरावती जिल्ह्यात यशोमती ठाकूर या कॅबिनेट मंत्री आणि बच्चू कडू राज्यमंत्री होते. यामुळे अमरावती जिल्ह्यातील रवी राणा आणि सुलभा खोडके या दोघांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. धामणगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांना विजयी झालेले प्रताप अडसड यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे.