मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होतील
नवनीत राणांचं वक्तव्य
बच्चू कडू वर हि केला शाब्दिक ‘प्रहार’
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२८अमरावती
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला आहे. त्यानंतरही अजून मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर झालेलं नाही. मुख्यमंत्रीपदासाठी यंदा देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत भाजपा श्रेष्ठींचा निर्णय मान्य असल्याची घोषणा केलीय. या सर्व घडामोडींमध्ये भाजपा नेत्या नवनीत राणा यांची त्यांच्या मनातील मुख्यमंत्री सांगितला आहे.
‘हा निकाल आम्हाला अपेक्षित होता. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होतील, असं राणा यांनी स्पष्ट केलं. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे सैनिक आहोत. त्यांनी गेल्या त्याग केला, यावेळी तसं होणार नाही. महाराष्ट्राच्या जनेतेचा विचार आम्ही घेऊन जात आहोत. देवेंद्र फ़डणवीस मुख्यमंत्री व्हावे, हे आमचं लक्ष आहे असं राणा यांनी स्पष्ट केलं.
बच्चू कडूंना टोला
अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील राजकीय वाद गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं गाजतोय. लोकसभा निवडणुकीत अमरावतीमधून नवनीत राणा पराभूत झाल्या होत्या. त्यांच्या पराभवात बच्चू कडू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महायुतीचा भाग असूनही कडू यांनी भाजपा उमेदवार राणांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीतही हा संघर्ष कायम होता. पण, यंदाच्या लढाईत राणा दाम्पत्यांची सरशी झाली. बडनेरा मतदारसंघातून रवी राणा विजयी झाले. तर, अचलपूरमधून बच्चू कडू यांना पराभव स्विकारावा लागला. बच्चू कडू यांच्या पराभवावर नवनीत राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या जनतेने बदला घेतला आहे. जनतेनं जागा दाखवून दिलीय. दादा आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय ना,’ असा टोला राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला. जनता जनार्दनाची औकात काढणाऱ्यांना जनतेनं औकात दाखवली आहे. ते आपल्या मतदारसंघातही दिवे लावू शकले नाहीत, अशी टीका राणा यांनी केली. बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीपासून वेगळं होतं, स्वतंत्र आघाडीची स्थापना केली होती. त्यांचा अचलपूर मतदारसंघात भाजपाच्या प्रवीण तायडे यांनी 12 हजार 131 मतांनी पराभव केला. तर नवनीत राणाचे पती रवी राणा बडनेरा मतदारसंघातून 66 हजार 974 मतांनी विजयी झाले.
————————
https://epaper.vidarbhaprajasattak.com